नवी दिल्ली : अंदमान-निकोबार बेटांवरील बाराटांगच्या चुनखडीच्या गुहा आणि चिखलातील ज्वालामुखींचा परिसर तसेच छत्तीसगडमधील सिरपूरचे सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय क्षेत्र यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अंदमानमधील नारकोंडम आणि बॅरन बेटांवरील ज्वालामुखी क्षेत्राचाही या यादीत समावेश झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.एखाद्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळ म्हणून विचार होण्यापूर्वी त्याचा युनेस्कोच्या संभाव्य यादीत समावेश होणे आवश्यक असते.

या तीन नवीन स्थळांमुळे भारताच्या युनेस्कोच्या संभाव्य यादीतील स्थळांची संख्या आता ८१ झाली आहे.बाराटांगचा भूवैज्ञानिक वारसा : बाराटांग बेटावर चुनखडीच्या अनेक गुहा व चिखलाचे सक्रिय ज्वालामुखी आहेत. दुर्गम भूप्रदेशामुळे येथील अनेक गुहांपर्यंत पोहोचणे कठीण आहे. या परिसरात खोल भेगा, अरुंद फटी आणि लपलेल्या गुहा आहेत.

त्यामुळे या क्षेत्राला वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नारकोंडम, बॅरन बेटे अभ्यासासाठी महत्त्वाची अंदमान समूहातील नारकोंडम आणि बॅरन ही बेटे ज्वालामुखींच्या अभ्यासासाठी महत्त्वाची आहेत. दीर्घकाळच्या भौगोलिक विलगीकरणामुळे येथे विशिष्ट परिसंस्था आणि स्थानिक प्रजातींचा विकास झाला आहे.महानदीच्या पूर्व तीरावरील सिरपूरचे ऐतिहासिक महत्त्व छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील सिरपूर हे महानदीच्या पूर्व तीरावर असून, रायपूरपासून ७८ किलोमीटर अंतरावर आहे.

प्राचीन कोसल राज्याची राजधानी म्हणून या नगराचा विकास झाला. शरभपुरीय आणि त्यानंतर पांडुवंशी राजवटीत सिरपूरचे महत्त्व वाढले. येथे विविध धर्मांच्या प्रभावातून विकसित झालेली मंदिरे आणि पुरातत्त्वीय वास्तू आढळतात.