मुंबई : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळानंतर पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून शनिवारी या क्षेत्राचे केंद्र आग्नेय बंगालचा उपसागर आणि त्यालगत असणा-या अंदमान व निकोबार द्वीपसमूह तसेच अंदमान समुद्राजवळ होते. दरम्यान, रविवारी रात्री या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळ मंगळवारी सकाळच्या सुमारास १०० ते ११० किमी प्रतितास वेगाने नेल्लोर आणि नरसापूर दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑक्टोबर अखेरीस बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागात पावसाची नोंद झाली. विशेषत: राज्याच्या दक्षिण भागात वादळी पावसाचा प्रभाव असल्याने या प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा अधिक होता. या दरम्यान सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, सांगली, अहिल्यानगर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच विदर्भातील बहुतांश भागात पावसाची नोंद झाली. तसेच मागील दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात देशात पावसाचे प्रमाण सरासरीहून कमीच राहील, असा अंदाज शनिवारी हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, पावसाळी हवामानामुळे कोकण प्रदेश आणि विदर्भातील कमाल तापमानात काहीशी घट झाली असून या प्रदेशात सरासरीहून कमी कमाल तापमानाची नोंद शनिवारी झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र शनिवारी कमाल तापमान सरासरीहून १ ते २ अंश सेल्सिअसने अधिक होते. तसेच बहुतांश भागात किमान तापमानही २ ते ५ अंश सेल्सिअने अधिक नोंदले जात आहे. पुढील काही दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने तर किमान तापमानात १ ते २ अशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून रविवारी काही भागात वादळी पावसाचा तर बहुतांश भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विदर्भातील यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी भागात हवामान विभागाने रविवारी वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सिंधुदुर्ग, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक घाट विभागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.